### *मांजाने चिरला इसमाचा गळा; गुन्हा दाखल*

KHOZ MASTER
2 Min Read

*संग्रामपूर, दि. ४ (प्रतिनिधी)*

शेगाव-दानापूर रोडवर पतंगाच्या धारदार मांजामुळे एका इसमाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेख अनिस शेख नफ्फार (वय ४०, रा. संग्रामपूर) असे जखमी इसमाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून मांजावर बंदी असल्याचे दावे केले जात असतानाही खुलेआम मांजाचा वापर होत असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख अनिस हे १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत दुचाकीने कामावरून घरी परतत होते. दानापूर येथील विद्युत वितरण कार्यालयाजवळील पुलावरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यासमोर धारदार मांजा आला. काही कळण्याच्या आतच मांजा गळ्यात रुतून त्यांचा गळा चिरला गेला. गंभीर जखमी अवस्थेत अनिस हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.
घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना वरवट बकाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना शेगाव आणि त्यानंतर अकोला येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ तसेच नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (ब) नुसार मांजा विक्री व वापरावर कडक बंदी आहे. असे असतानाही दानापूर-तेल्हारा परिसरात हा मांजा कुठून आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हिवरखेड व तामगाव परिसरातून छुप्या मार्गाने मांजाची विक्री सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून ही बेकायदेशीर विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *