हॉस्पिटल परिसरात वळूची टक्कर; वाहतूक खोळंबली अर्धा तास हटण्याची पाहावी लागली वाट

Khozmaster
3 Min Read

मलकापूर, दि. ४ (प्रतिनिधी)

मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील ४० बिघा परिसरात ४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास दोन मोकाट वळूंमध्ये अचानक झुंज सुरू झाली. ही झुंज तब्बल अर्धा तास सुरू राहिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला कुतूहलाचा विषय वाटणारा हा प्रकार काही वेळातच वाहतुकीस मोठा अडथळा ठरला. परिणामी रुग्ण, नातेवाईक तसेच वाहनचालकांना सावध राहून झुंज संपण्याची वाट पाहावी लागली.

उपजिल्हा रुग्णालयासमोरून ४० बिघाकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या परिसरात शासकीय व खासगी मिळून अनेक रुग्णालये आहेत. अशा वर्दळीच्या ठिकाणी दोन वळूंनी रस्त्याच्या मध्यभागीच एकमेकांवर शिंगांची जोरदार टक्कर देत रिंगण मांडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.

रुग्णालय परिसर असल्याने येथे रुग्णवाहिका, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच ऑटोरिक्षांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र वळूंची झुंज सुरू होताच वाहनचालकांनी तातडीने वाहने थांबवली. काही नागरिकांनी सुरक्षित अंतर राखत बाजूला उभे राहणे पसंत केले, तर काहींनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

झुंजीदरम्यान एक वळू थेट रस्त्यालगतच्या पानटपरीमध्ये घुसल्याने टपरीचे मोठे नुकसान झाले. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आठ ते दहा दुचाकी एकामागोमाग कोसळल्या. आजूबाजूला उभी असलेली वाहने जागेवरच थांबली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वांसाठी धोकादायक परिस्थिती

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व दुचाकीस्वार यांच्यासाठी ही घटना अत्यंत धोकादायक ठरू शकली असती. मोकाट जनावरांचा प्रश्न शहरात नवीन नसून, वारंवार अशा घटना घडूनही ठोस व प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे रुग्णालय परिसरातील रुग्णवाहिकेच्या मार्गावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “याच वेळी एखादी आपत्कालीन रुग्णवाहिका आली असती, तर तिचा मार्ग मोकळा झाला असता का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

पालिका प्रशासनावर टीका

सार्वजनिक रस्त्यावर मोकाट जनावरे फिरणे कायद्याने गुन्हा ठरत असताना याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जनावरे पकडण्याच्या मोहिमा, गोठ्यांची व्यवस्था व मालकांवर दंडात्मक कारवाई हे उपाय केवळ कागदापुरतेच मर्यादित आहेत का, असा उपरोधिक सवालही नागरिकांनी केला.

नागरिकांनी केली हस्तक्षेपाची भूमिका

अखेर काही जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत मोठ्या प्रयत्नाने वळूंना वेगळे केले. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने वाहतूक सुरळीत झाली आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, “आज निभावले” अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी नगरपालिकेने गंभीर दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

0 9 4 9 6 2
Users Today : 134
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *