अंढेरा, दि. ४ (प्रतिनिधी)
अंढेरा परिसरात ज्वारीचे पीक सध्या हुरड्याच्या अवस्थेत असताना बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी धुके अशा सततच्या हवामान बदलांमुळे ज्वारी व हरभरा पिके धोक्यात आली असून ज्वारीवर मावा व चिकटा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
अंढेरा परिसरातील पिंपरी आंधळे, शिवणी आरमाळ, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, पाडळी शिंदे आदी गावांमध्ये ज्वारीच्या कणसांवर चिकटा स्पष्टपणे दिसून येत असून अनेक ठिकाणी कणीस काळे पडत असल्याचे चित्र आहे. दाणे भरण्याच्या अवस्थेतच कणसांचे नुकसान होत असल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण कायम असून सकाळच्या वेळेस धुक्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ज्वारी व हरभरा पिकांवर आळीचाही प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हुरड्याच्या अवस्थेत असलेल्या ज्वारीच्या पिकावर चिकटा वाढत असल्याने केवळ दाण्यांवरच नव्हे तर चाऱ्याच्या गुणवत्तेवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरवर्षी बदलत्या हवामानाचा फटका बसत असल्याने हातात आलेले पीक नुकसान होऊन वाया जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचेही चित्र आहे.
दरम्यान, ज्वारीवरील मावा व चिकटा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाने तातडीने शेतात पाहणी करून योग्य उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
Users Today : 129