बुट्टा ग्रामस्थांचे बीडीओंना निवेदन
वर्दडी बुद्रुक, दि. ४ (प्रतिनिधी)
सिंदखेड राजा तालुक्यातील धानोरा सटवाई गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बुट्टा गावात विकासकामे प्रत्यक्ष न करता केवळ कागदोपत्री कामे दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार व गैरव्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत बुट्टा ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) निवेदन सादर करून सखोल चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
धानोरा सटवाई ग्रामपंचायतीअंतर्गत धानोरा, बुट्टा आणि निमखेड ही तीन गावे येतात. बुट्टा येथे मागील काही वर्षांपासून विकासकामांच्या नावाखाली आर्थिक अपहार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीचा “आदर्श ग्राम” म्हणून उल्लेख केला जात असला तरी प्रत्यक्षात गावाची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले की, बुट्टा येथील अंगणवाडी मागील पाच वर्षांपासून बंद असून ती बंद का आहे याची माहिती प्रशासनाने द्यावी. तसेच कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना या ग्रामपंचायतीला आदर्श ग्राम दर्जा कोणत्या निकषांवर देण्यात आला, याची सखोल चौकशी करण्यात यावी. कागदावरच विकासकामे; निधीचा अपहार
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पीठगरणीचे काम केवळ कागदावर दाखवून त्याचे बिल लाटण्यात आले. तसेच आरओ फिल्टरचे बिल काढण्यात आले असले तरी प्रत्यक्षात आरओ फिल्टर गावात उपलब्ध नाही. सांडपाणी व्यवस्थापनाच्या नावाखाली निधी काढून मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली आहे.
पोषण अभियानांतर्गतही कागदोपत्री काम दाखवून देयके काढण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच कचरा व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले खड्डे व घंटागाडी गावात प्रत्यक्ष उपलब्ध नसतानाही खर्च दाखविण्यात आल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
आरोग्य व कीटकनाशक धूर फवारणी गावात एकदाही झाली नसताना त्यावर निधी खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. गावातील नाली बांधकामाच्या दर्जाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय अंगणवाडी साहित्य, आरोग्य सेवकांचे तपासणी साहित्य, फर्निचर स्टेबलायझर आणि केबल खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घरकुल योजनांसाठी बेकायदेशीर पैसे मागितले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
या प्रकरणी २६ फेब्रुवारीपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदन देताना समाधान पवार, संतोष चाफले, सुजय गिते, वैभव चाफले, लक्षण मुंडे, राहुल मंगल, रामेश्वर पवार, अमोल वाघ, निखिल चाफले, कारभारी पवार, सोपान ढगे व प्रकाश ढगे उपस्थित होते.
मोबाईल अॅपद्वारे भ्रष्टाचार उघड केल्याचा दावा
निवेदन देणाऱ्या तरुणांनी मोबाईल अॅपद्वारे माहिती मिळवत गावात कोणती विकासकामे प्रत्यक्ष झाली किंवा नाही, तसेच कोणत्या कामांची बिले काढण्यात आली याचा तपास करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भ्रष्टाचार उघड केल्याचा दावा केला आहे.
Users Today : 129