अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार : आ. संजय गायकवाड

Khozmaster
3 Min Read

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ
बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी)

दैनंदिन जीवनातील वाढते ताण-तणाव तसेच मोबाइल व समाजमाध्यमांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे पारंपरिक खेळ व संस्कृती हळूहळू लोप पावत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या मातीशी नाळ घट्ट जुळलेली राहावी, यासाठी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.

तसेच आगामी काळात बुलढाणा शहराची क्रीडा क्षेत्रात नवी ओळख निर्माण होईल व नावलौकिक वाढेल यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक, इंडोर स्टेडियम आणि जलतरण तलाव उभारण्यात येईल, असे आश्वासनही आ. गायकवाड यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आयोजित तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ आज स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात होते.

यावेळी मंचावर रिपिका खरात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त नवलकर, अधीक्षक हांडे, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयोजन समितीचे सदस्य सचिव आशिष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, सतीश देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल हल माने, कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मंडोगडे यांच्यासह सर्व पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, प्रशासकीय कामकाज करताना निर्माण होणाऱ्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने छंद जोपासणे आवश्यक आहे. सुदृढ शरीर आणि सशक्त मनासाठी अंगी असलेल्या कलागुणांचा तसेच क्रीडा क्षमतांचा विकास गरजेचा आहे.अजितदादांना आदरांजली

समारंभाच्या सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी महाराष्ट्र गीत गायन केले.

क्रीडा ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन

आ. संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण आणि क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्व खेळाडूंना शपथ देण्यात आली. यावेळी संगीतमय वातावरणात आकाशात विविध रंगी फुगे सोडून स्पर्धांचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये नियुक्त पंचांनी वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून स्पर्धकांना न्याय द्यावा, असे आवाहनही आमदार गायकवाड यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात गुलाबराव खरात यांनी खेळाडूंना दिलेल्या शपथेचा संदर्भ देत शिस्त व सभ्यतेने तीन दिवसीय स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच आमदार संजय गायकवाड हे स्वतः क्रीडापटू असल्याने त्यांनी क्रीडा विकासासाठी ठोस सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयोजन समितीचे सचिव आशिष पवार यांनी ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची पार्श्वभूमी विशद केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले.

0 9 4 9 4 2
Users Today : 114
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *