शेंदुर्जनमध्ये हरिनाम सप्ताहाचा गजर; तरुण पिढीवर संस्कारांची शिदोरी

KHOZ MASTER
2 Min Read

शेंदुर्जन, दि. ४ (प्रतिनिधी)

सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून १ फेब्रुवारीपासून हा आध्यात्मिक सोहळा भक्तिभावाने सुरू आहे. या सप्ताहाचा शुभारंभ डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शिंगणे यांनी संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी शेंदुर्जन गावाच्या धार्मिक परंपरेचे विशेष कौतुक केले. शेंदुर्जनमध्ये वर्षभर विविध देवांचे सप्ताह व धार्मिक कार्यक्रम सातत्याने होत असल्याने आगामी काळात या गावात कोणत्या देवाचे मंदिर नाही, हे शोधणे कठीण होईल, असे त्यांनी सांगितले.

येथील सातत्यपूर्ण आध्यात्मिक कार्यामुळे तरुण पिढी सुसंस्कारित होत असून शेंदुर्जन गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात “संतांचे गाव” म्हणून निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या सप्ताहामुळे संपूर्ण गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले आहे. दररोज पहाटे काकड आरती, त्यानंतर हरिपाठ, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन आणि सामूहिक पारायण अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. गावकऱ्यांनी दाखवलेल्या एकीमुळे व भक्तीभावामुळे शेंदुर्जनला खऱ्या अर्थाने ‘मिनी पंढरी’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.

लोकसहभागातून सेवाकार्य

सप्ताहासाठी शेंदुर्जनसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून बाहेरगावच्या भक्तांसाठी ग्रामस्थांच्या वतीने दररोज फराळ आणि महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ. शिंगणे यांनी बाहेरून आलेल्या भाविकांशी तसेच संत गजानन महाराज समितीच्या सदस्यांशी चर्चा करून आयोजन व नियोजनाची माहिती घेतली.

या आध्यात्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक श्रवणाचा लाभ घेण्यासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी होत आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *