ढेरा, दि. ४ (प्रतिनिधी)
‘गीता-भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे’, या भावपूर्ण संकल्पनेतून इसरुळ (ता. चिखली) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे १७ वे वर्ष मोठ्या भक्तिभावात साजरे होत आहे. माघ कृष्ण पंचमी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी कलश मिरवणुकीने या धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ होणार असून सांगता माघ कृष्ण १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
इसरुळ येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित या सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, रामायण कथा, हरिकिर्तन, हरिपाठ, हरिजागर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव, व्यसनाधीनता व मानसिक अस्वस्थतेने ग्रासलेल्या समाजाला अध्यात्मिक आधार मिळावा, मानवी मूल्यांचे पुनरुज्जीवन व्हावे आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी या उद्देशाने हा सप्ताह आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
उद्या ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कलश मिरवणूक काढण्यात येणार असून ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान कलशारोहन व स्वामीजींचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते २ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ रामायण कथा, सायंकाळी ६ हरिपाठ, रात्री ७ ते ८ भोजन, तर रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व हरिजागर होणार आहे. या सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन लाभणार आहे.
एकादशी व महाशिवरात्री निमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ दरम्यान मिरवणूक काढण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी विशेष कीर्तन होईल व त्यानंतर दुपारी १२ ते ५ महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजक, व्यवस्थापक व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Users Today : 114