जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांमधून सामाजिक संदेश

Khozmaster
3 Min Read

बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी)

स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभात खेळाडूंनी केलेले पथसंचलन सामाजिक संदेश देणारे ठरले. जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या व जिल्हा परिषद मुख्यालय अशा एकूण १४ संघांच्या खेळाडूंनी विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करत मान्यवरांना मानवंदना दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खेळाडू चमूंनी शिस्तबद्ध पथसंचलन करत उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली.

पथसंचलनाची सुरुवात जिल्हा परिषद मुख्यालयाच्या संघाने केली. राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करत ढोल-ताशे, लेझीम व भगव्या पताकांसह गणेश पूजनाचा भक्तिभाव दर्शविणारा भव्य देखावा उभारण्यात आला.

त्यानंतर शेगाव पंचायत समितीच्या चमूने मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विविध महापुरुषांची वेषभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा पंचायत समितीने जिजाऊ व बाल शिवबा यांच्यासह मावळ्यांची वेशभूषा धारण करून महिला व बाल संगोपनासाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य व पोषण योजनेस राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे नाव दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले तसेच बाल संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले.

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मोताळ्यांच्या चमूने मातृभाषेतील शिक्षण व मराठी शाळांचे संवर्धन याबाबत जनजागृती केली. याच विषयाला अनुसरून पंचायत समिती मेहेकरच्या चमूने ग्रामीण भागातील मराठी शाळा वाचवा, असे आवाहन करणारे कथानक सादर केले.

देऊळगाव राजा पंचायत समितीच्या चमूने मराठी संस्कृतीतील विविध सण-उत्सवांचे दर्शन घडवून आपली वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पंचायत समिती लोणारच्या चमूने नाट्य संगीतिकेद्वारे नवभारत साक्षरता अभियानाचा संदेश दिला.

महिला संरक्षण व सुरक्षेच्या अनुषंगाने पंचायत समिती खामगावच्या खेळाडूंनी अॅसिड हल्ल्याचे संवेदनशील दृश्य उभे करून *”तिला जाळू नका”* हा समाजसुधार संदेश देत *”होईल मी स्वयंसिद्ध”* असा महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग व बलिदानाची वीरगाथा सादर करत चिखली व जळगाव जामोद येथील खेळाडूंनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.

तर मलकापूर व नांदुरा पंचायत समितीच्या चमूंनी स्वतंत्रपणे ऑपरेशन सिंदूर व दहशतवादविरोधी मोहिमेच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाची सक्षमता व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.

जिल्ह्यातील दुर्गम गावांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘संग्राम’ अभियानाच्या अनुषंगाने बुलढाणा पंचायत समितीच्या चमूने पारंपरिक बंजारा वेषभूषेत व बोलीभाषेत आकर्षक नृत्य सादर करून जनजागृती केली.

चौदाही संघांनी सादर केलेल्या या सामाजिक आशययुक्त देखाव्यांमुळे उद्घाटन समारंभातील पथसंचलन अत्यंत आकर्षक व लक्षवेधक ठरले.

0 9 4 9 4 2
Users Today : 114
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *