लोणार, दि. ४ (प्रतिनिधी)
रामसर साईट असलेल्या लोणार सरोवर येथे ‘मी लोणारकर टीम’ व अकोला वन्यजीव विभागाच्या वतीने जागतिक पाणथळदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता पक्षी निरीक्षण, सरोवर भ्रमंती तसेच स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. पाणथळ जागा व पक्ष्यांची माहिती महाराष्ट्र पक्षी मित्र जिल्हा समन्वयक तसेच ‘मी लोणारकर टीम’चे सचिन कापुरे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
पाणथळ जागेचे महत्त्व संतोष जाधव यांनी स्पष्ट केले, तर स्वच्छतेचे महत्त्व लोणार रेंज ऑफिसर वन्यजीव विभागाचे अधिकारी मनोज रामटेके यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाला सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल येथील शिक्षकवृंद तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. यासोबतच ‘मी लोणारकर टीम’चे विलास जाधव, उमेद चिपडे, सर्पमित्र विनय कुलकर्णी, कमलेश आगरकर, प्रकाश सानप, वनपाल सदाशिव वाघ, वनरक्षक पोले, ठाकरे तसेच लोणार वन्यजीव विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे, तर देशातील ४१ वे रामसर स्थळ ठरले आहे.
जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणथळ जागा जसे तलाव, नद्या, खाड्या, दलदलीचे प्रदेश, सरोवर यांचे संरक्षण करणे या उद्देशाने दरवर्षी २ फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो.
यावर्षी “पाणथळ जागा आणि पारंपारिक ज्ञान – सांस्कृतिक वारसा साजरा करणे” ही संकल्पना निवडण्यात आली होती.
Users Today : 114