बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी)
संत नगरी शेगाव येथे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने राज्यातील विविध ठिकाणांहून संत गजानन भक्तांसाठी विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी सावळा येथील शिवसेनेचे नेते अनिल जगताप यांच्यासह भाविक-भक्तांनी केली आहे.
संत नगरी शेगाव येथे प्रगटदिनानिमित्त राज्यातील विविध भागांमधून दिंड्या दाखल होत आहेत. मात्र, दिंड्यांमध्ये सहभागी न झालेल्या तसेच कामानिमित्त इतर ठिकाणी असलेल्या भक्तांना प्रगटदिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी तत्काळ व थेट गाड्यांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.
शेगावला पोहोचण्यासाठी अनेक भक्तांना इतर गाड्यांद्वारे किंवा गाड्या बदलत प्रवास करावा लागत असून त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
यामुळे भाविक भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच थेट शेगावपर्यंत प्रवास सुलभ व्हावा, याकरिता राज्यातील विविध बसस्थानकांवरून विशेष एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी अनिल जगताप यांच्यासह भाविक भक्तांनी केली आहे.
Users Today : 114