मोताळा, दि. ४ (प्रतिनिधी)
‘श्रमदानातून ग्रामविकास’ हा मंत्र केवळ घोषवाक्यापुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी दत्तक ग्राम वारुळी येथे जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी वारुळी येथील डोंगरावर ११३ सलग समतल चर (सीसीटी) खोदून उल्लेखनीय कार्य केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. नीलेश कडू व जिल्हा समन्वयक डॉ. हनुमंत भोसले यांनी ३ फेब्रुवारी रोजी शिबिराला विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
महाविद्यालयाच्या श्रमदान शिबिरास २९ जानेवारीपासून वारुळी येथे सुरुवात झाली. शिबिरातील जय शिवराय, डॉ. पंजाबराव देशमुख, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता आणि माता रमाई या पाच गटांनी शिस्तबद्ध पद्धतीने हे कार्य पूर्ण केले.
डोंगरमाथ्यावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी डोंगर उतारावर तब्बल ११३ सीसीटी खड्डे खोदले. या उपक्रमामुळे भविष्यात वारुळी परिसरातील जलपातळी वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास डॉ. नीलेश कडू यांनी व्यक्त केला.
हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो विभागप्रमुख डॉ. प्रवीण ठेंग, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुप्रिया बेहेरे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अभय ठाकूर व डॉ. अरुण गवारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, विविध शाळा व महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक तसेच शिक्षकांनी अशा प्रकारच्या सलग समतल चर खोदण्याच्या उपक्रमाचा अवलंब केल्यास डोंगराळ भाग हिरवाईने फुलून जाईल तसेच पाण्याची उपलब्धता वाढण्यास मोठी मदत होईल, असे मत व्यक्त केले
Users Today : 114