३२ तासांनंतर वाहतूक सुरू होताच पुन्हा खोळंबा; लोणावळ्याजवळ कंटेनर बंद पडल्याने एक्सप्रेस वे ठप्प

Khozmaster
2 Min Read

पुणे, दि. ४ (प्रतिनिधी)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. खंडाळा घाटातील अडथळे दूर होऊन तब्बल ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत होत असतानाच लोणावळ्याजवळ सिमेंटचा कंटेनर बंद पडल्याने पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या घटनेमुळे लोणावळ्यापासून मागे २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

नेमकी परिस्थिती काय?

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सिमेंटने भरलेला कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडला. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे मंदावली असून काही काळ वाहने जागेवरच अडकून पडली आहेत. महामार्ग पोलीस आणि आयआरबी प्रशासनाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र, तोपर्यंत वाढलेल्या वाहनसंख्येमुळे कोंडी अधिक तीव्र झाली आहे.

रात्रभर वाहनातच मुक्काम

खंडाळा घाटातील ३२ तासांच्या वाहतूक कोंडीनंतर रात्री उशिरा मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, अनेक वाहनचालकांना याची माहिती नसल्याने आणि कोंडीमुळे वैतागून त्यांनी वाहनातच मुक्काम केला. सकाळी वाहतूक सुरळीत करताना महामार्ग पोलिसांना झोपलेल्या वाहनचालकांना उठवून गाड्या पुढे सरकवाव्या लागल्या.

सध्या लोणावळ्यापासून सुमारे २० किलोमीटर आधीपासूनच वाहने अडकली असून गेल्या दोन तासांत अनेक वाहने केवळ एक ते दोन किलोमीटरच पुढे सरकू शकली आहेत. मावळ परिसरातून एक्सप्रेस वेवर येणाऱ्या प्रवाशांनाही या भीषण कोंडीचा मोठा फटका बसला आहे. लोणावळ्याजवळ अजूनही ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा कायम आहेत.

दीड लाख वाहनं अडकली होती

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ३ फेब्रुवारीपासून सुमारे २५ किलोमीटरपर्यंत दीड लाखांहून अधिक वाहने अडकली होती. अन्न, पाणी व मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. तसेच बुधवारी सकाळपासून टोल वसुलीही तात्पुरती थांबवण्यात आली होती.

या कोंडीचा मोठा फटका एसटी महामंडळालाही बसला असून १६३ हून अधिक बसेस विविध ठिकाणी अडकल्या होत्या. परिणामी ई-शिवनेरीसह १३९ बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्याची माहिती समोर आली आहे.

0 9 4 9 4 2
Users Today : 114
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *