पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) –
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वनशील रसायन घेऊन जाणारा गॅस टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून सरकारवर तीव्र टीका करत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
मंगळवारी सायंकाळी गॅस टँकर पलटी झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, यामुळे महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना अंधार, अन्न-पाण्याचा अभाव आणि तासन्तास न हलणारी वाहने अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. लहान मुलांसह हजारो प्रवाशांची मोठी फरपट झाल्याने या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
टोल परत करण्याची मागणी
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश दिले जातात. पण अशा चौकशांतून प्रशासन काही बोध घेतं का, हा खरा प्रश्न आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
टँकर पलटी झाल्यानंतर वाहतूक थांबवणे योग्य असले तरी अशा आपत्तींसाठी तातडीचा कृती आराखडा प्रशासनाकडे होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेल्या या द्रुतगती मार्गाला २४ वर्षे झाली, मात्र आपत्ती व्यवस्थापनाबाबत आजही गांभीर्य दिसत नाही. या काळात केवळ एकच गोष्ट तत्परतेने केली गेली, ती म्हणजे टोल वसुली,” अशी टीका त्यांनी केली.
‘आधी प्रवास सुरळीत करा’
राज ठाकरे यांनी पुढे लिहिले आहे की, अर्थसंकल्पात मुंबई–पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा झाली आहे. “ती होईल तेव्हा होईल, पण त्याआधी मुंबई–पुणे प्रवास तरी सुरळीत करा,” अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. तसेच, या काळात प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला टोल सरकारने परत करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“आज मुंबई–पुणे प्रवास किती वेळात पूर्ण होईल, याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. मुंबई आणि पुणे ही राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत, असे म्हणायचे आणि ३२ तास या दोन शहरांमधील वाहतूक ठप्प होते याकडे शांतपणे पाहायचे, हा कोडगेपणा अनाकलनीय आहे,” असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
Users Today : 95