क्षयरुग्णांच्या मदतीसाठी आमदार सिद्धार्थ खरात यांचा पुढाकार; १०३ रुग्णांचे पालकत्व स्वीकारले

Khozmaster
2 Min Read

मेहकर प्रतिनिधी :
संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारांमध्ये होत असून, जगासह भारतातही क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पुरेसा पोषण आहार मिळाल्यास रोगमुक्त होण्याचे प्रमाण वाढते, या पार्श्वभूमीवर मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे.
उपचाराखाली असलेल्या क्षयरुग्णांना सामाजिक सहाय्य मिळावे, उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळावा तसेच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, या उद्देशाने आमदार सिद्धार्थ खरात यांनी १०३ क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारून ‘निक्षय मित्र’ म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. निक्षय मित्र योजनेच्या माध्यमातून क्षयरुग्णांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे.
क्षयरुग्णांसाठी पोषण आहार अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रौढ क्षयरुग्णांना प्रति महिना सुमारे ३ किलो गहू, १.५ किलो डाळ, २५० ग्रॅम खाद्यतेल व १ किलो दूध पावडर, तर बाल क्षयरुग्णांना २ किलो गहू, १ किलो डाळ, २५० ग्रॅम खाद्यतेल व ७५० ग्रॅम दूध पावडर देणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण १६८२ क्षयरुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी मेहकर मतदारसंघातील १०३ रुग्णांचे पालकत्व आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे या रुग्णांना नियमित पोषण आहार मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, मेहकरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय बलकार यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना ‘मी निक्षय मित्र’ फ्रेम देऊन स्वागत केले.

0 9 4 9 2 3
Users Today : 95
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *