लढाणा प्रतिनिधी :
बुलढाणा शहरातील मलकापूर रोड परिसरातील चोपडा शोरूमच्या पाठीमागे असलेल्या एका घरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर रोड परिसरात राहणारे सचिन शंकर शिल्लारकर (वय ३५) यांचा चहाचा व्यवसाय आहे. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ते नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेले. त्यावेळी घरी त्यांचे आई-वडील व पत्नी होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची आई व पत्नी नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या. त्यानंतर दुपारी २.३० वाजता वडील घराला कुलूप लावून बाहेर पडले.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पत्नी घरी परतल्या असता घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यावर लोखंडी कपाटाचे लॉकर तोडलेले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे आढळले. तपासणी केली असता कपाटात ठेवलेली १ लाख ४० हजार रुपयांची रोकड व अंदाजे ५१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी सचिन शिल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३) व ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी; मलकापूर रोड परिसरातून १.९१ लाखांचा ऐवज लंपास
0
9
4
8
9
1
Users Today : 63
Leave a comment