बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी):
जिल्ह्यातील प्रलंबित जमीन महसूल, थकीत कर तसेच गौणखनिज दंडाची शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल यंत्रणेला कडक निर्देश दिले आहेत. महसूल वसुली प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी आता प्रशासनाकडून सक्तीने वसुली करण्यात येणार असून, थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
विशेषतः गौणखनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अशा प्रकरणातील प्रलंबित दंड त्वरित वसूल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत.
महसूल विभागाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदींनुसार थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीसारखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकांना गावोगावी भेटी देऊन थेट वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वारंवार मुदत देऊनही थकीत कर व गौणखनिज दंड न भरणाऱ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, त्यांच्यावर कठोर पावले उचलण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, प्रशासकीय कारवाई आणि दंडात्मक बोजा टाळण्यासाठी थकीत जमीन महसूल, कर आणि गौणखनिज दंड त्वरित जमा करावा. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, गावपातळीवर दररोज वसुलीचा आढावा घेतला जाणार आहे.
शासकीय महसूल आणि गौणखनिजावरील दंड हा विकासकामांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्व स्तरावर ही वसुली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
Users Today : 63