मलकापूर, दि. ५ (प्रतिनिधी):
शैक्षणिक फी भरून तसेच शासनाची शिष्यवृत्ती जमा होऊनही स्थानिक आरएएनएम नर्सिंग कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थिनींना गुणपत्रिका तसेच प्रवेशावेळी जमा केलेली मूळ कागदपत्रे परत देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. कॉलेज प्रशासनाकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत तब्बल १२ विद्यार्थिनींनी न्यायासाठी मलकापूर शहर पोलिसांत धाव घेतली असून, या प्रकरणामुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
स्थानिक आरएएनएम नर्सिंग कॉलेजमध्ये सुमारे ५० ते ६० विद्यार्थिनी शिक्षण घेत असून तक्रारदार विद्यार्थिनींनी तत्कालीन मुख्याध्यापक पवन भगवान मानकर यांच्याकडे दरवर्षी ३४ हजार ४०० रुपये याप्रमाणे दोन वर्षांची एकूण ६८ हजार ८०० रुपये शैक्षणिक फी रोख स्वरूपात तसेच काही विद्यार्थिनींनी ऑनलाईन पद्धतीने जमा केल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित विद्यार्थिनींचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून परीक्षेचा निकालही लागला आहे. मात्र निकाल जाहीर होऊनही कॉलेज प्रशासन विद्यार्थिनींना पास झाल्याचे प्रमाणपत्र तसेच प्रवेशावेळी जमा केलेली १० वी व १२ वीची मूळ कागदपत्रे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
विद्यार्थिनींनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, फी पूर्ण भरलेली असतानाही महाराष्ट्र शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कमही कॉलेज प्रशासनाने स्वतःकडेच ठेवली आहे. फी आणि शिष्यवृत्तीचे पैसे मिळूनही कॉलेज प्रशासन कागदपत्रे अडवून ठेवल्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित कॉलेज प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघमित्रा अशोक गवई, ऋषाली अरूण इंगळे, प्रांजल राजेंद्र सूर्यवंशी, निकीता वसंता इंगळे, अर्पिता संजय पवार, प्रणाली गणेश इंगळे, योगिता संजय तांबे, प्रियंका सुनील खंडारे, प्रिती प्रविण शिरसाट, नेहा गजानन धुरंधर, शुभांगी सोपान पवार यांच्यासह अन्य विद्यार्थिनींनी केली आहे.
या प्रकरणामुळे मलकापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नर्सिंग कॉलेजकडून विद्यार्थिनींची फसवणूक फी भरूनही गुणपत्रिका व मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; १२ विद्यार्थिनींची पोलिसांत तक्रार
0
9
4
8
9
1
Users Today : 63
Leave a comment