बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी)
गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून प्रत्येक व्यक्तीला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा अधिक सहज, सुलभ व सक्षम बनविण्यासाठी ठोस कार्यप्रणाली अमलात आणण्याच्या सूचना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (नवी दिल्ली) तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत नागरिकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सुविधा पोहोचविणे, आयुष उपचार पद्धतीचा विस्तार करणे आणि आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना ना. जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली ‘स्वस्थ भारत, सशक्त भारत’ या संकल्पनेतून निरोगी महाराष्ट्र व विकसित भारतासाठी प्रभावी आरोग्य व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
बैठकीदरम्यान राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण, किटकजन्य आजार, आयुष आरोग्य मंदिर, आयुष ग्राम यासारख्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव निपुल विनायक, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या सचिव डॉ. भारती बलकवडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त डॉ. नितीन अंबाळेकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. रमण घुमराळेकर, आयुष विभाग संचालक तसेच मंत्रालयीन उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
Users Today : 63