बुलढाण्यात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी)
शहरातील मलकापूर रोड परिसरातील चोपडा शोरूमच्या पाठीमागील भागात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर रोड परिसरात राहणारे सचिन शंकर शिल्लारकर (वय ३५) यांचे चहाचे हॉटेल असून ते ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे कामासाठी हॉटेलवर गेले. त्या वेळी घरी आई-वडील व पत्नी उपस्थित होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिल्लारकर यांची आई व पत्नी नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी घराबाहेर गेल्या. दुपारी २.३० वाजता त्यांचे वडीलही घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले.
दरम्यान दुपारी ३ वाजता शिल्लारकर यांची पत्नी घरी परतली असता घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी कपाटाचे लॉकर तोडलेले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. तपासणी केली असता कपाटात ठेवलेली १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच ५१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे जुने दागिने, असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सचिन शिल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे करीत आहेत.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *