नांदुरा, दि. ५ (प्रतिनिधी)
गेल्या पंधरा वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून होत असलेला शारीरिक व मानसिक छळ, तसेच माहेरून पैसे व शेतीतील हिस्सा आणण्यासाठी लावलेला तगादा असाह्य झाल्याने ३५ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वडाळी (ता. नांदुरा) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मयत विवाहितेचे नाव वर्षा जयंत वक्टे (वय ३५) असे असून तिचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी जयंत वक्टे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिल्यानंतर पती जयंत वक्टे याने दारू पिऊन वर्षाला मारहाण करणे सुरू केले. तसेच “माहेरून पैसे घेऊन ये आणि तुझ्या वाट्याची शेती आमच्या नावावर कर,” असा तगादा लावत तिच्यावर सतत दबाव टाकण्यात येत होता.
याशिवाय सासरच्या इतर मंडळींकडूनही तिचा मानसिक छळ सुरूच असल्याने वर्षा प्रचंड तणावात होती. अखेर ३ फेब्रुवारीच्या रात्री सततच्या जाचाला कंटाळून तिने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच वर्षाचा भाऊ संदीप सोपान फरपट (रा. अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती जयंत वामन वक्टे, सासू शांताबाई वामन वक्टे, सासरे वामन वक्टे, जेठ अनंता वामन वक्टे व अमोल वामन वक्टे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८५ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक आवारे करीत आहेत.
Users Today : 63