जिल्ह्यात अवैध बायोडिझेल पंपांचा सुळसुळाट कारवाईचे आदेश देऊनही प्रशासन गप्प; मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा इशारा

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी)
बुलढाणा जिल्ह्यातील महामार्गालगत अवैध बायोडिझेल पंपांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाल्याचे चित्र असून, विभागीय आयुक्त तसेच पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले असतानाही जिल्हा प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे भविष्यात दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास त्यास संपूर्णपणे जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीने दिला आहे.

खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख फाटा तसेच जिल्ह्यातील इतर भागांमध्ये अवैध बायोडिझेल पंप बेधडक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने २ जानेवारी २०२६ रोजी पत्र (क्र. आकाअ/पुरवठा-५/कावि-२/२०२६) काढून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय पालकमंत्र्यांनीही कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे हे पंप आजही सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अवैध बायोडिझेल हे अत्यंत ज्वालाग्राही व धोकादायक असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी मलकापूर तालुक्यात अशाच एका अवैध पंपामुळे झालेल्या दुर्घटनेत दोन निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आंदोलन झाल्यावर प्रशासनाने काही काळ कारवाईचा दिखावा केला. मात्र काही दिवसातच हे मृत्यूचे सापळे पुन्हा सक्रिय झाल्याचा आरोप होत आहे.

विशेषतः चिखली परिसरातील नागरिक सध्या भीतीच्या छायेत वावरत असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांनी प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर लोकायुक्त तसेच उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *