बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी)
मनरेगा अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले असून हे आंदोलन चौथ्या दिवशीही राज्य शासनाकडून दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे. २ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या आंदोलनात राज्यातील ३४ जिल्ह्यांतील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. याचा थेट परिणाम बुलढाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांतील मनरेगा कामांवर झाला असून विविध विकासकामे ठप्प पडली आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी २३ जानेवारीपासून असहकार आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे बुलढाण्यासह ३४ जिल्ह्यांतील मनरेगा कामे प्रभावित झाली होती. मात्र शासन व प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मजुरांच्या संख्येत मोठी घट
या आंदोलनामुळे घरकुल, सिंचन विहीर, वृक्ष लागवड, फळबाग, पाणंद रस्ते आदी कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत. बुलढाणा जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून सरासरी १५ हजार मजूर कामावर होते. मात्र ३१ जानेवारीला मजुरांची संख्या ५९०४ पर्यंत घसरली, तर आज ५ फेब्रुवारीला ही संख्या १७९३ पर्यंत खाली आली आहे. अशीच स्थिती राज्यातील इतर ३४ जिल्ह्यांतही असल्याचे सांगण्यात येत आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार
या आंदोलनात राज्यातील सुमारे २२०० ते ४३०० कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असून त्यामध्ये एमआयएस समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, क्लार्क कम डेटा ऑपरेटर, वाहन चालक यांचा समावेश आहे.
मनरेगाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर योजनांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत कायम किंवा समायोजित करावे, एस-२ इन्फॉटेकमार्फत होणारी अनधिकृत व अवैध भरती बंद करावी, कर्मचाऱ्यांची निवड राज्य निधी असोसिएशनमार्फतच करावी, तसेच मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून पदनिहाय आकृतिबंध तयार करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी एल्गार पुकारला आहे.
Users Today : 50