शिरपूर, दि. ५ (प्रतिनिधी):
शिरपूर येथील श्री संत जानगीर महाराज संस्थानच्या मालकीच्या शेतामध्ये मागील तीन दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात करण्यात आली आहे. शिरपूर हे वाशीम जिल्ह्यात हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मागील अनेक वर्षांपासून येथे हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
शिरपूर परिसरात दरवर्षी जवळपास ३ हजार एकरांहून अधिक क्षेत्रात हळदीचा पेरा घेतला जातो. सालागणिक हळद लागवडीचे क्षेत्र वाढत असून शेतकऱ्यांचे मुख्य व वार्षिक पीक म्हणून हळद महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हळद उत्पादनामुळे परिसरातील शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या सुखावला आहे.
संस्थानच्या शेतातून हळद काढणीला सुरुवात करण्यात आली असून मागील तीन दिवसांपूर्वी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीतून हळद काढण्यात आली. त्यानंतर मजुरांमार्फत हळद वेचणीचे काम सुरू आहे.
साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी लागवड केलेली हळद फेब्रुवारी महिन्यानंतर काढण्यास सुरुवात होते. मात्र, संस्थानमध्ये होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हळद थोडी लवकर काढण्यात येत आहे.
निसर्गाचा लहरीपणा असूनही यंदा बऱ्यापैकी हळदीचे उत्पादन होईल, असा सकारात्मक अंदाज संस्थानच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
हळद काढल्यानंतर ती साठवून वाळवली जाते. त्यानंतर उकळणी व घासणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही हळद बाजारात विक्रीसाठी पूर्णपणे तयार होणार आहे.
Users Today : 50