मुंबई/अकोला, दि. ५ (प्रतिनिधी):
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून शिवसेनेच्या काही नेत्यांनी या शपथविधीबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत शिवसेनेच्या नेत्यांना कठोर शब्दांत सुनावले आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थखाते वगळता इतर खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली. तसेच पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र या निर्णयानंतर शपथविधी घाईने पार पडल्याचा आरोप करत काही शिवसेना नेत्यांनी टीका केली.
शिवसेना नेत्यांकडून टीका
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, “दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. दादांची राखही शांत झाली नाही आणि सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावली. दहा दिवस थांबलं असतं तर काय बिघडलं असतं?” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही “शपथविधी इतक्या लवकर कोणी करायला लावला?” असा प्रश्न उपस्थित केला. तर संजय शिरसाट यांनीही निधनानंतर लगेच शपथविधी झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीसांचा संतप्त प्रतिक्रिया
शिवसेना नेत्यांच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून सुरू असलेला वाद निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक जण या घटनेतून आपले राजकारण कसे करता येईल, याचा प्रयत्न करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, “राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मोठे नेते अजित दादा दुर्दैवाने आपल्यातून गेले. त्यांच्या निधनानंतर अशा प्रकारे खालच्या स्तराचे राजकारण करणे अयोग्य आहे. हे बंद झाले पाहिजे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे शपथविधीवरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Users Today : 50