छत्रपती संभाजीनगर, दि. ५ (प्रतिनिधी):
महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर व उपमहापौर पदासाठी हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उपमहापौर पदाच्या निवडीआधीच शिंदे गटात बंडखोरीचे संकेत मिळत असून पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवत अनेक ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद दाखवली. अनेक महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपकडे महापौरपद तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संभाजीनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर आहे. जरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली असली तरी शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे.
पक्ष आदेश डावलून अर्ज दाखल करण्याची तयारी
मात्र उपमहापौर पदाच्या निवडीआधीच शिवसेना शिंदे गटात मतभेद उफाळल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाकडून त्रिंबक तुपे, अनिता घोडले आणि हर्षदा शिरसाट हे पक्ष आदेश डावलून उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
याशिवाय जिल्हा परिषद मतदान पार पडल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजेंद्र जंजाळही मैदानात
दुसरीकडे शिंदे गटाचे नेते राजेंद्र जंजाळ यांनीही उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उपमहापौर निवडीच्या निमित्ताने शिंदे गटात संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ असा राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरसेवकांची दोन गटात विभागणी
सध्याच्या परिस्थितीत त्रिंबक तुपे, अनिता घोडले, हर्षदा शिरसाट, सिद्धांत शिरसाट, छाया वाघचौरे, श्वेता त्रिवेदी, किशोर नागरे, अभिजित जीवनवाल, प्रेमलता दाभाडे आणि राजू राजपूत हे नगरसेवक मंत्री संजय शिरसाट यांच्या बाजूने असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ऋषीकेश जैस्वाल आणि यशोदा शेळके हे दोन नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या बाजूने असल्याची चर्चा आहे.
Users Today : 50