संग्रामपूर, दि. ६ (प्रतिनिधी) :
शेतकऱ्याच्या घरासमोरून दुचाकी चोरी करून नेणाऱ्या तीन चोरट्यांना तामगाव पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
तालुक्यातील वकाना येथील शेतकरी बद्रीनारायण ठोंबरे यांच्या घरासमोर एमएच-२८-बीटी-३५०९ क्रमांकाची होंडा युनिकॉर्न दुचाकी उभी होती. मात्र १८ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सदर दुचाकी चोरी करून नेली. ठोंबरे यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला; मात्र दुचाकी न मिळाल्याने त्यांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा
तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार विष्णू कोल्हे यांनी तपास हाती घेतला. अखेर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत दुचाकी जळगाव जामोद येथील ईरशाद खान रहेमत खान व शेख साजीद शेख हबीब यांच्याकडे आढळून आली.
कसून चौकशी केली असता आरोपींनी सदर दुचाकी शेख जाकीर शेख जहाँबाज (रा. हिवरखेड) याने गहाण स्वरूपात ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन शेख जाकीरला पकडण्यासाठी कारवाई केली. मात्र तो सोनाळा बस स्टँड परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली आहे.
Users Today : 50