चिखली, दि. ६ (प्रतिनिधी) :
शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध व अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी चिखली पोलिसांनी आज शहरात मोठी तपासणी मोहीम राबवली. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात ही विशेष कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
चिखली शहरातील पारधी बाबा रोड आणि काळे हॉस्पिटल परिसरातील काही कॅफेंमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत ठाणेदार भूषण गावंडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून या परिसरातील विविध कॅफेंची अचानक तपासणी केली.
सीसीटीव्ही, नोंदी व आसनव्यवस्थेची बारकाईने तपासणी
या तपासणीदरम्यान कॅफेंमधील आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, ग्राहक नोंदी तसेच इतर आवश्यक बाबींची सखोल पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली.
नियमबाह्य वेळेत कॅफे सुरू ठेवल्यास कारवाईचा इशारा
तपासणीदरम्यान संबंधित कॅफे चालकांना पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या. नियमबाह्य वेळेत कॅफे सुरू राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कोणत्याही कॅफेमध्ये अवैध प्रकार किंवा अनैतिक कृत्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला.
या कारवाईदरम्यान अनेक कॅफेचालकांना जागीच कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या.
Users Today : 50