लोणार, दि. ६ (प्रतिनिधी) :
घराला दरवाजा नसल्याचा फायदा घेत रात्री झोपेत असलेल्या महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वेणी (ता. लोणार) येथे घडली. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला व तिच्या बहिणीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसांत आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेणी येथील ३४ वर्षीय महिला दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२.१५ वाजता दरम्यान आपल्या मुलांसोबत टिनपत्राच्या झोपडीत झोपलेली होती. तिच्या घराला दरवाजा नसल्याचे हेरून आरोपी अभिमन्यू वाघमारे (रा. वेणी) याने घरात प्रवेश करून पीडितेचा विनयभंग केला.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे पीडिता घाबरली व तिने आरडाओरड केली. पीडितेचा आवाज ऐकून तिची बहीण झोपेतून जागी होऊन मदतीसाठी धावली असता आरोपीने पीडिता व तिच्या बहिणीला हाताचापटाने मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी पीडितेने मेहकर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अभिमन्यू वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, ७४, ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई करीत आहेत.
Users Today : 50