बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :
स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे रथसप्तमी दिनानिमित्त दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धा उत्साहात पार पडली. या उपक्रमात इयत्ता सातवीच्या सीबीएसई व स्टेट बोर्डच्या एकूण ६१५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १२ सूर्यनमस्कार करत अडीच तासांत एकूण ७३८० सूर्यनमस्कार पूर्ण केले.
या कार्यक्रमासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर तथा योग शिक्षक कालिंदा नागरे, शिवाजी नागरे व स्वाती देगलूकर यांच्या सहकार्याने जालना जिल्ह्यातील छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्र, अंबड येथील राज्य समन्वयक तथा योगतज्ज्ञ देवा चित्राल यांनी विद्यार्थ्यांना श्वसनाचे शास्त्रोक्त मार्गदर्शन करत प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाची सुरुवात ओमकार साधना व प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर योगिक जॉगिंग, वॉर्मअप, सूक्ष्म व्यायाम तसेच सूर्यनमस्कारपूर्व तयारीसाठी बटरफ्लाय, शिशुपालासन, मार्जरी आसन, नाडी विभाजन व पवनमुक्त हालचाली घेण्यात आल्या. बीज मंत्रासह चार सूर्यनमस्काराचा सराव करून शेवटी स्पर्धात्मक स्वरूपात विद्यार्थ्यांनी १२ सूर्यनमस्कारांचे लयबद्ध व कलात्मक सादरीकरण केले.
स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी श्रीनिवास प्रमुख हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा कोमल झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद व क्रीडा प्रशिक्षकांनी विशेष परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला.
Users Today : 50