दाभा, दि. ६ (प्रतिनिधी) :
स्टेट बँक शाखा हिरडव अंतर्गत मौजे पहुर येथील महिला खातेदार सिंधूताई शंकर मुंढे यांचा काही महिन्यांपूर्वी सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत मृत सिंधूताई मुंढे यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांचा विमा दावा मंजूर करून धनादेश प्रदान करण्यात आला.
मृतक सिंधूताई मुंढे या महिला बचत गटाच्या सदस्य होत्या. त्या हिरडव येथील स्टेट बँक शाखेत नियमित व्यवहार करीत होत्या. याचदरम्यान त्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना समजून घेऊन वार्षिक २० रुपयांचा हप्ता भरून विमा काढून घेतला होता. मात्र दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्टेट बँक शाखा हिरडवचे शाखा व्यवस्थापक प्रसन्न गणेश झलके यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा केला. त्यानंतर विमा दावा मंजूर होऊन मृतक महिलेचे वारस व पती शंकर मुंढे यांना २९ जानेवारी रोजी दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी शाखा व्यवस्थापक प्रसन्न झलके यांच्यासह सहाय्यक प्रणव ठाकरे, चेतन रेखाते, श्रीकृष्ण ओव्हर, गौतम आठवले, ग्राहक सेवा केंद्र चालक योगेश डोळस तसेच स्टेट बँकेचे ग्राहक उपस्थित होते.
Users Today : 36