शेगाव, दि. ६ (प्रतिनिधी) :
तालुक्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथे संत गोमाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताह उत्सवाची सांगता झाली असून श्रींच्या पालखीचे संत मुक्ताबाई यात्रेसाठी प्रस्थान झाले आहे. २९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
उत्सवानिमित्त गोमाजी महाराज ग्रंथ पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, हरीपाठ, काकडा आरती, कीर्तन, गोंधळ, गोपालकाला तसेच महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दररोज सकाळी ४ ते ६ काकडा आरती, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण तसेच रात्री ८ ते १० कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.
या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला. ५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. गुरुवर्य सारंगधर महाराज पांडे (गोळेगावकर) यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर सकाळी ८ वाजता पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा व महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.
दरम्यान, दुपारी २ वाजता संत गोमाजी महाराजांची पालखी मुक्ताबाई यात्रेसाठी रवाना झाली. पालखीचे शेगाव येथील गजानन महाराज संस्थानमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शन घेतले. सायंकाळी पालखीचा मुक्काम गर्गाचार्य महादेव संस्थान (वाचनालय), शेगाव येथे ठेवण्यात आला असून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.
६ फेब्रुवारी रोजी पालखी पुढील मुक्कामी रवाना झाली. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी रांगोळ्या काढून स्वागत केले. पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या पालखी सोहळ्यात तीनशेहून अधिक वारकरी सहभागी असून ते संत मुक्ताबाई यात्रेसाठी पायदळ वारी करीत आहेत.
संत गोमाजी महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त धनंजय पाटील यांनी सहकुटुंब पालखीची पूजा करून दर्शन घेतले. संत गोमाजी महाराजांची पालखी ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मुक्ताईनगर येथे पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली.
Users Today : 36