अपात्र ठरलेल्या ५४ हजार ‘लाडक्या बहिणी’ पुन्हा ठरणार पात्र अचूक ई-केवायसीनंतर मिळणार लाभ; ३१ मार्चपर्यंत सुधारणा करण्याची संधी

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :
चुकीचा पर्याय निवडल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र ठरलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ५४ हजार ९९१ महिलांना पुन्हा एकदा दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळण्याचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. शासनाने ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची नवीन संधी उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यातील हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. यासाठी शासनाने वेळोवेळी मुदतवाढ दिल्यानंतर ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र ई-केवायसी करताना अनेक महिलांनी गोंधळामुळे चुकीचा पर्याय निवडला, परिणामी पात्र असूनही त्या महिलांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा लाभ थांबला आणि महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान “कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ किंवा केंद्र-राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत नियमित, कायम, कंत्राटी कर्मचारी आहे का?” तसेच “निवृत्तीवेतन घेत आहे का?” अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये योग्य पर्याय निवडण्यात चूक झाल्याने अनेक महिलांचा लाभ बंद झाला.

महिलांचा संताप; कार्यालयांवर धडक

लाभ थांबल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. महिला व बाल विकास कार्यालयावर धडक देणे, तालुकास्तरावरील कार्यालयांमध्ये वारंवार चकरा मारणे, तसेच खामगाव भागात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणे अशा घटना घडल्या. हा प्रकार राज्यभर दिसून आल्याने शासनावर दबाव वाढला होता.

पोर्टलमध्ये सुधारणा; अंतिम संधी

महिला व बाल विकास विभागाने लाभार्थ्यांची पडताळणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलमध्ये सुधारणा करून ३१ मार्च २०२६ पर्यंत ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भातील परिपत्रक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे.

शासनाने यापुढे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.

या निर्णयामुळे चुकीचा पर्याय निवडून अपात्र ठरलेल्या हजारो महिलांना पुन्हा एकदा योजनेचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली असून जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.

0 9 4 8 6 4
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *