मलकापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :
शहरातील नांदुरा रोडवरील मातोश्री हॉलसमोर दुचाकीची डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे मलकापूर शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.
मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील रहिवासी ज्ञानदेव पुंडलिक चिमकर (वय ४८) हे व्यावसायिक असून त्यांनी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून १ लाख ७० हजार रुपये रोख काढले. ही रक्कम त्यांनी कापडी पिशवीत ठेवून आपल्या एमएच-१९-बीएच-०४२८ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की लॉक केली होती.
यानंतर चिमकर हे दुचाकीने खामगावकडे निघाले. दुपारी सुमारे १२.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नांदुरा रोड येथे मातोश्री हॉलसमोर त्यांनी दुचाकी सर्व्हिस रोडच्या कडेला उभी केली. नैसर्गिक विधीसाठी ते काही क्षण झाडाच्या आडोशाला गेले. काही मिनिटांत परत आल्यावर त्यांना दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तुटलेले दिसून आले. तसेच डिक्कीतील १ लाख ७० हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी ज्ञानदेव चिमकर यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रामचंद्र भोपळे करीत आहेत.
Users Today : 36