अकोला, दि. ६ (प्रतिनिधी) :
शिवपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य अत्यंत प्रभावीपणे सादर करणाऱ्या तुळसाबाई कावल विद्यालय, पातूर येथील विद्यार्थी कलावंतांचा छावा संघटनेतर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला.
पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालयाच्या प्रांगणात शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेरार एज्युकेशन सोसायटी पातूरचे व्यवस्थापक तथा माजी प्राचार्य विजयसिंह गहिलोत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, दास मोबाईलचे संचालक रितेश मिझापुरे, सौ. स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमन सिंह गहिलोत, छावा जिल्हा संघटक निवृत्ती वानखडे, उपाध्यक्ष गोपाल पाटकर, बाळासाहेब लाहोळे, डॉ. संतोष भिसे, अनिरुद्ध भाजीपाले, श्रीनाथ पहेलवान, देवेंद्र मोहोकार, तालुकाप्रमुख सोनू गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी सादर करण्यात आलेल्या या महानाट्यात सर्वच विद्यार्थी कलावंतांनी दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांसमोर संभाजी युग जिवंत केले. या महानाट्यात संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे उज्ज्वल कांबळे, अभिजीत तायडे, कवी कलशची भूमिका साकारणारे अमित खंडारे, येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या स्वरा पवार, बहिर्जी नाईकाच्या भूमिकेतील हर्षल भुसांडे यांच्यासह इतर कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
छावा संघटनेने या महानाट्याची विशेष दखल घेत दास मोबाईलच्या सौजन्याने स्कूल बॅग देऊन सर्व विद्यार्थ्यांचा गौरव केला.
यावेळी प्रदीप खाडे व निवृत्ती वानखडे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमास मदर इंडिया कॉन्व्हेंट पातूरचे प्राचार्य महेंद्र खंडारे, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर. एस. ढेंगे, पर्यवेक्षिका पी. एम. कारस्कर, पर्यवेक्षक एस. आर. मुखाडे, सहाय्यक शिक्षक अर्जुन गहिलोत यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
Users Today : 36