नागपूर : यशोधरानगर परिसरातील ऑटोमोटिव्ह चौकात गुरुवारी मध्यरात्री जुन्या वैमनस्यातून झालेल्या रक्तरंजित हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले. गोल्डी कालेर आणि बंटी संधू अशी जखमींची नावे असून, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डी आणि बंटी हे दोघे गुरुवारी रात्री त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून लग्न समारंभासाठी जात होते. यावेळी शेर-ए-पंजाब लॉन जवळ तीन कारमधून आलेल्या १० ते १२ सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांची अॅक्टिव्हा अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जखमी गोल्डी कालेर हा मकोकामधून फरार असलेल्या गुल्लूचा नातेवाईक असल्याची माहिती असून त्याचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच राजा रंधावा आणि जग्गू संधू यांनी त्यांच्या साथीदारांसह हा हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणी जखमींच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
Users Today : 36