बेकायदा रेती उपशाविरुद्ध एल्गार; मुंबई-नागपूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन

Khozmaster
2 Min Read

दुसरबीड, दि. ७ (प्रतिनिधी)
राहेरी येथील तढेगाव फाटा परिसरातील ऐतिहासिक लॉंगमार्च नामांतर संघर्षभूमीवर वाळूमाफियांनी बेकायदा रेती उपसा सुरू केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. बेसुमार रेती उत्खननामुळे पाणीपातळी घटत असून भविष्यात परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या गंभीर बाबींची दखल घेत अवैध रेती उपसा तत्काळ बंद करावा, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी राहेरी बुद्रुक येथे मुंबई-नागपूर ७५३ सी महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

हे आंदोलन तब्बल दोन तास चालले, त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

प्रशासनाची तातडीची कारवाई

आंदोलनाची तीव्रता पाहता महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत संबंधित रेती घाटावर छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन बोटी, दोन पोकलेन तसेच टिप्पर जप्त करण्यात आले. चौकशी पूर्ण होईपर्यंत रेती उपसा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ऐतिहासिक संघर्षभूमीचे नुकसान

राहेरी पुलाजवळील ही जागा नामांतर लढ्याच्या ऐतिहासिक आंदोलनाची साक्ष देणारी असून येथे स्मारकाचे काम सुरू आहे. मात्र या पवित्र स्थळी वाळूमाफियांनी रेतीचा साठा करून उत्खनन सुरू ठेवल्याने स्मारक परिसराचे गंभीर नुकसान होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पाणीटंचाईचा धोका वाढला

रेती उपशामुळे नदीतील पाणीपातळी झपाट्याने घसरत असून उन्हाळ्यात दुसरबीड, राहेरीसह परिसरातील सुमारे ४० गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध न राहण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

उपोषणाचा इशारा आणि प्रत्यक्ष उपोषण सुरू

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफान अली शेख, तसेच विविध स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र कारवाई होत नसल्याने आज मधुकर शिंदे व भिकाजी इंगळे यांनी स्मारकस्थळी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अनेक मान्यवर व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी

या आंदोलनात शेतकरी, महिला, भीम अनुयायी तसेच परिसरातील विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाच्या कारवाईवेळी तहसीलदार अजित दिवटे, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लांडगे, किनगाव राजा ठाणेदार संजय मातोंडकर यांच्यासह पोलीस व महसूल पथक उपस्थित होते.

0 9 4 8 6 4
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *