डोणगाव, दि. ७ (प्रतिनिधी) –
मेहकर शहरात नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या बाजूला करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्विमिंग पूलचे अद्याप लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे सदर स्विमिंग पूल तत्काळ सुरू करून लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी मेहकर येथील युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रामराजे कापरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मेहकर नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी शहरातील युवकांसाठी मोठ्या खर्चाने स्विमिंग पूल उभारला होता. मात्र अनेक वर्षांपासून या स्विमिंग पूलचे गेट बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील युवकांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी पुरेशी क्रीडांगणे उपलब्ध नसून, उद्यान किंवा मनोरंजनासाठी योग्य सार्वजनिक ठिकाणेही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत स्विमिंग पूल बंद ठेवण्यात येणे ही गंभीर बाब असल्याचे युवकांनी सांगितले.
सदर स्विमिंग पूल बंद ठेवण्यामागील कारण प्रशासनाने सार्वजनिक करावे किंवा तो तत्काळ कार्यान्वित करून नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर दानिश खान, शेख इमरान, शेख साहिल, शेख इरफान, शेख कासिफ, आदेश जागीरदार आदी युवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Users Today : 36