अंढेरा (प्रतिनिधी) –
अंढेरा येथील एकता ध्वज परिसरात मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक वंदना घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, समिती सदस्य, महिला मंडळ तसेच पुरुष मंडळ यांच्या वतीने प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले. सायंकाळी एकता ध्वजापासून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
मिरवणुकीदरम्यान घोषणाबाजी तसेच सामाजिक संदेशांच्या माध्यमातून रमाई आंबेडकर यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. त्यांच्या त्याग, संघर्ष व प्रेरणादायी जीवनकार्याची आठवण करून देत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
Users Today : 32