लोणार, दि. ७ (प्रतिनिधी) –
लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी नगर परिसरातील रहिवाशांना नवीन विद्युत ट्रान्सफार्मर तत्काळ सुरू करून दिलासा दिल्याबद्दल नगरवासीयांनी या कामाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
या नगरात मागील पाच वर्षांपासून अत्यंत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही ट्रान्सफार्मर मंजूर न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. यापूर्वी नगरवासीयांना सुमारे ९०० मीटर अंतरावर असलेल्या ट्रान्सफार्मरवरून कमी दाबाचा वीजपुरवठा मिळत होता. त्यामुळे घरातील विद्युत उपकरणे चालविणे तसेच बोरवेलमधून पाणी उपसा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
कधी कमी तर कधी अतिउच्च दाबामुळे उपकरणे निकामी होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
अखेर शासनाच्या डीपीडीसी योजनेतून या नगरासाठी नवीन ट्रान्सफार्मर मंजूर झाला. मात्र कामाची गती अत्यंत मंद असल्याने नगरातील नागरिकांनी उपविभागीय उपकार्यकारी अभियंता उमेश शेंडे यांच्या कार्यालयात जाऊन समस्या मांडल्या. तसेच सहाय्यक अभियंता अक्षय बोबडे यांनी पुढाकार घेऊन दोन दिवसांत नवीन ट्रान्सफार्मर सुरू करून देण्याची मागणी केली.
यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ उमेश निमकर्डे आणि वायरमन परमेश्वर सांगळे यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करून नागरिकांच्या समस्या दूर केल्या. नवीन ट्रान्सफार्मर सुरू झाल्यानंतर नगरवासीयांनी फटाके फोडून जल्लोष केला.
यावेळी आशिष स्वामी (कीर्तनकार), नितीन मेरत, अंकुश नागरे, विठ्ठल तनपुरे, विठ्ठल भाकडे, शिवशंकर खारवाल, संतोष पुंड, संतोष मुंढे, दीपक आघाव, अंकुश चव्हाण, संदीप मुंढे, श्रीरंग काळे, प्रसाद वर्हेकर, गणेश चव्हाण, कैलास जायभाये यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
Users Today : 33