डोणगाव, दि. ७ (प्रतिनिधी) –
समृद्धी महामार्गावर वाहतूक सुरळीत राहावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत इमर्जन्सी लेन मोकळी ठेवावी, यासाठी ‘नो पार्किंग’ झोन तयार करण्यात आले आहेत. मात्र डोणगाव शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात वाहने उभी करून कब्जा केल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २६७ व २६८ दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अपघात घडत असून, त्यामागील प्रमुख कारण इमर्जन्सी लेनवर उभी राहणारी अवजड वाहने असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी मुंबई व नागपूर दोन्ही कॉरिडॉरच्या बाजूने वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
इमर्जन्सी लेनचा गैरवापर
इमर्जन्सी लेन ही टायर पंक्चर, वाहन बिघाड, अॅम्बुलन्स किंवा पोलिस वाहनांसाठी राखीव असते. मात्र या लेनवर दोन्ही बाजूने शेकडो ट्रक व अवजड वाहने उभी राहत असल्याने आपत्कालीन वाहनांना मार्ग मिळत नाही. तसेच उभ्या वाहनांमुळे मागून येणारी वाहने धडक देऊन गंभीर अपघात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अधिकाऱ्यांची पाहणी; तरीही कारवाई नाही
१३ जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खदि, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार, तहसीलदार निलेश मडके तसेच स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणी करून उपाययोजनांच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानंतर समृद्धी प्रशासनाने संबंधित ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ घोषित केला. मात्र तरीही त्या ठिकाणी वाहने उभी राहत असून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सुरक्षेची जबाबदारी दुर्लक्षित
समृद्धी महामार्ग सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांसह महामार्ग पोलीस तैनात असतानाही दररोज इमर्जन्सी लेनवर शेकडो वाहने उभी राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरक्षेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॅमेरे व रेस्ट पॉइंट व्यवस्था मजबूत करण्याची मागणी
या परिसरात कॅमेरे बसवून सतत देखरेख करावी तसेच पेट्रोल पंपाजवळील रेस्ट पॉइंटवर वाहनधारकांनी वाहने लावावीत यासाठी योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. रेस्ट पॉइंटवर होणारी बेकायदा वसुली थांबविल्यास वाहनधारक नो पार्किंग झोनमध्ये वाहने न लावता रेस्ट पॉइंटवरच वाहने उभी करतील, असेही मत व्यक्त होत आहे.
Users Today : 32