संग्रामपूर/सोनाळा, दि. ७ (प्रतिनिधी) –
“मुली व मुलांनो, दोन मार्क कमी पडले तरी चालतील; पण आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा. त्यांच्याशी मोठ्याने बोलू नका, मृदू भाषेत बोला. त्यांची सेवा करा. कारण आई-वडील गेले, तर भिंतीवरचा फोटो कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही,” असे हृदयस्पर्शी विचार व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
सोनाळा बसस्थानकाजवळील बापू स्टेडियम येथे समस्त गावकरी मंडळी व सोनाळा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित ‘न समजलेले आई-बाप समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. त्यांच्या प्रभावी आणि भावनिक शैलीतील व्याख्यानाने विद्यार्थी, पालक व उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले.
ढोल-ताशा व फटाक्यांत स्वागत
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद कन्या शाळेच्या लेझीम पथकासह ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत डॉ. हंकारे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते २३ वर्षे देशसेवा करणारे अनिल वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संत सोनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष दाभाडे यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
आई-वडील हेच खरे देव
“मुला-मुलींच्या आयुष्यात एकच देव असतो तो म्हणजे बाप आणि एकच देवी असते ती म्हणजे आई. आपल्या एखाद्या कृतीमुळे आई-वडिलांची मान खाली जाईल असे कृत्य घडू देऊ नका. त्यांना लाचार करू नका,” असे सांगत डॉ. हंकारे यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या सन्मानाची जाणीव करून दिली.
‘आई-बापाने तुमच्यासाठी किती रन काढले याचा हिशोब करा’
“तुम्ही आयपीएलमध्ये रन मोजता, हिशोब ठेवता. पण ज्या आई-वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, मोठं केलं, अंगाखांद्यावर खेळवलं—त्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी किती रन काढले याचा हिशोब कधी करणार?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी उपस्थितांना भावनिक केले.
भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील होऊन लाखो रुपये कमावले तरी ते पाहण्यासाठी आई-वडीलच नसतील तर त्या पैशाचा काय उपयोग, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
परिवर्तनाचा संदेश
“आज अनेक मुलांच्या तोंडून ‘आई हेट यू मम्मी पप्पा’ असे शब्द निघतात. पण हे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे. हरवलेले आई-वडील पुन्हा मिळवण्याची वेळ आली आहे,” असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
Users Today : 32