मलकापूर, दि. ७ (प्रतिनिधी) –
मोताळा वनपरिक्षेत्रांतर्गत नांदुरा तालुक्यातील मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वडनेर भोलजी गावाजवळ अवैध आडजात लाकडांची वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने जप्त केला. या कारवाईमुळे अवैध वनसंपत्ती तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
एमपी-०९-एचजी-५५७७ क्रमांकाच्या ट्रकमधून लाकडांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जिल्हा उपवनसंरक्षक सरोज गवस यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वन अधिकारी (दक्षता) कमलेश पाटील तसेच सहायक वनसंरक्षक के. डी. पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोताळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) पी. व्ही. अळसपुरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या वाहतूक केली जाणारी लाकडे आढळून आली. त्यामुळे सदर ट्रक ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी ट्रकचालक आरोपी इरफान खान नसीर खान (वय ३४), रा. बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत वनपाल ए. एन. सपकाळ, यू. जे. कारेगाव्कर तसेच वनरक्षक आर. बी. सिरसाट यांनी सहभाग घेतला.
Users Today : 32