लोणार, दि. ७ (प्रतिनिधी) –
लोणार येथील ब्राह्मण गल्लीत तत्कालीन आमदार संजय रायमूलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या ४० लाख रुपयांच्या निधीतून ब्राह्मण समाजासाठी भव्य सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रा. बळीराम मापारी हे होते. लोणार शहरात विविध समाज बांधवांसाठी तसेच धार्मिक ठिकाणी एकूण सात सभामंडपांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. ब्राह्मण समाजाच्या मागणीनुसार ब्राह्मण गल्लीत सभामंडपासाठी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आकर्षक स्वरूपात सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री समारंभपूर्वक सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गणेशमूर्तीचे पूजन संजय रायमूलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, युवासेनेचे तालुकाप्रमुख गजानन मापारी, सचिन कापुरे, शालिक डव्हळे, समाधान साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचा सत्कार सुधीर काळे, प्रल्हाद कुहे, संकेत कुन्हे, बाळू कुन्हे, कैलास इंगळे, राम उंबरकर यांनी केला.
यावेळी बोलताना संजय रायमूलकर यांनी सांगितले की, लोणार शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून आणण्यात आला. लोणार विकास प्रकल्पासाठी ४०० कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करून आणण्यात आला असून पाणीपुरवठा योजनेसाठीही भरघोस निधी मिळविण्यात आला आहे. पुढील काळातही महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे निरंतर सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. बळीराम मापारी यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास दत्ता कुन्हे, अनिल कुहे, द्वारकाप्रसाद व्यास, श्रीराम काळे यांच्यासह ब्राह्मण समाजातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 32