विदर्भपंढरीत भक्तांचा महापूर! संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन उत्साहात साजरा

Khozmaster
2 Min Read

हजारो भाविकांनी समाधिस्थळी घेतले दर्शन, शेगाव नगरी भक्तिमय

फहीम देशमुख
शेगाव, दि. ८ :
विदर्भपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. प्रगटदिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींच्या समाधिस्थळी दर्शन घेतले, त्यामुळे संपूर्ण शेगाव नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

प्रगटदिन सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासूनच भाविकांचा ओघ वाढू लागला होता. गर्दी लक्षात घेऊन मंदिर दर्शनासाठी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात आली होती. श्रींच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी “जय गजानन” च्या गजरात वातावरण दुमदुमून टाकले.


धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

प्रगटदिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी आरती, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि पूजन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडले. भक्तांनी समाधिस्थळी दर्शन घेतल्यानंतर प्रसादाचा लाभ घेतला.


पालखी सोहळ्याने शेगावला भक्तीची शोभा

प्रगटदिनानिमित्त श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा मोठ्या उत्साहात पार पडली. पालखी मिरवणूक विविध मार्गांवरून मार्गक्रमण करीत मंदिर परिसरात परतली. पालखीच्या दर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती.


रेल्वे व एसटी विभाग मालामाल

प्रगटदिनासाठी राज्यातील विविध भागांतून वारकरी आणि भक्त मोठ्या संख्येने शेगावमध्ये दाखल झाले. यामुळे रेल्वे स्थानक व बसस्थानकावर मोठी वर्दळ पाहायला मिळाली. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.


पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसर, पालखी मार्ग आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दल व आरोग्य विभागही सज्ज ठेवण्यात आला.


नगरपरिषदेची स्वच्छता मोहीम

उत्सव काळात स्वच्छता राखण्यासाठी शेगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने विशेष पथक नेमले होते. पालखी मार्गावरील कचरा तत्काळ उचलून घंटागाडीत टाकण्यात येत होता.


सोमवारी उत्सवाची सांगता

श्री संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सवाची सांगता सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली.

0 9 4 8 6 1
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *