शेगाव, दि. ८ :
श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन उत्सव श्री संस्थानच्या वतीने दि. २ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. उत्सव काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहात दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ तसेच रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन असे कार्यक्रम नियमितपणे पार पडले.
नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न
सप्ताहात हभप राम बुवा डोंगरे (जाटनांदूर), हभप मनोज बुवा कुलकर्णी (पिंप्राळा), हभप अनिरुध्द बुवा क्षिरसागर (सावरगाव मा.), हभप बळीराम बुवा दौंड (शिवर), हभप संभाजी बुवा मेहुणकर (धाराशिव), हभप मयुर बुवा बोडखे (श्रीक्षेत्र देहू), हभप श्रीहरी बुवा वैष्णव (जालना) आदी कीर्तनकारांचे कीर्तन मोठ्या भक्तिरसात संपन्न झाले.
महारूद्र रस्वाहाकार यागाची पूर्णाहुती
श्री महारूद्र रस्वाहाकार यागास माघ वद्य १ रोजी प्रारंभ झाला. माघ वद्य ७ रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती करण्यात आली. तसेच ‘श्रींच्या प्रागट्टया’ निमित्त श्रीहरी कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
१०२९ दिंड्यांचा सहभाग, नविन दिंड्यांना वाद्य-साहित्य वाटप
यावर्षी प्रगटदिन उत्सवात श्रींच्या सेवेत एकूण १०२९ दिंड्यांनी सहभाग घेतला. यामधून नियमांची पूर्तता करणाऱ्या ८८ नविन दिंड्यांना संस्थानकडून १० टाळ, १ विणा, १ मृदंग, तसेच श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संतवाङ्मय आणि श्री माऊली पताका वितरीत करण्यात आल्या.
जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्तीकरिता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान तसेच इतर व्यवस्थेसाठी सहाय्य देण्यात आले.
भोजन प्रसाद व प्रथमोपचार सुविधा
उत्सवानिमित्त आलेल्या भजनी दिंड्यांतील वारकऱ्यांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विसावा संकूल येथे प्रथमोपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
सर्व शाखांमध्ये उत्सव, २,३४,२४० भक्तांना महाप्रसाद वितरण
उत्सव काळात शेगावसह श्री संस्थानच्या पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा आदी सर्व शाखांमध्येही प्रगटदिन उत्सव भक्तिभावात संपन्न झाला. या सर्व ठिकाणी मिळून २,३४,२४० भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले
Users Today : 32