४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा आज शेवटचा दिवस १० फेब्रुवारीपासून प्रशासक राजवट; विस्तार अधिकारी व अभियंता स्तरावरील अधिकाऱ्यांकडे कारभार

Khozmaster
2 Min Read

सिंदखेड राजा, दि. ८ (प्रतिनिधी) :
सिंदखेड राजा तालुक्यातील एकूण ४३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ दि. ९ फेब्रुवारी रोजी संपत असून, दि. १० फेब्रुवारीपासून या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होईपर्यंत प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी, अभियंता स्तरावरील अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार असून एका अधिकाऱ्याला दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.


४३ ग्रामपंचायतींचा समावेश

या निर्णयांतर्गत सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा, जळगाव, पिंपळगाव लेंडी, वसंतनगर, दत्तापूर, धांदरवाडी, डावरगाव, भोसा, दुसरबीड, सोनोशी, चिंचोली, खामगाव, हनवतखेड (महा), महारखेड, वडाळी, शेंदुर्जन, सायाळा, भंडारी, ढौरव्ही, राजेगाव, राहेरी बु., सुलजगाव, देऊळगाव कोळ, कोनाटी, कंडारी, जागदरी, लिंगा, उमनगाव, साखरखेर्डा, पिंपळखुटा, विझोरा, गारखेड, पिंपरखेड, नाईकनगर, पळसखेड चक्का, वाघोरा, पोफळ शिवणी, मलकापूर पांग्रा, गोरेगाव, हिवरागडलिंग, हनवतखेड म.पा., कुंबेफळ व आंबेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.


सरपंच-सदस्यांचे अधिकार संपुष्टात

प्रशासक राजवटीत ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांचे अधिकार संपुष्टात येणार असून सर्व प्रशासकीय व आर्थिक निर्णय प्रशासकांकडून घेतले जाणार आहेत. दैनंदिन कामकाज, विकास कामांची देखरेख, कर्मचाऱ्यांचे नियंत्रण, तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी ही जबाबदारी प्रशासकांवर राहणार आहे.


ग्रामस्थांमध्ये चिंता; विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता

लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काही निर्णय प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एका अधिकाऱ्याकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कार्यभार दिला जाणार असल्याने कामाचा ताण वाढून विकास कामांचा वेग कमी होईल का, अशी शंका ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

मात्र प्रशासकीय अधिकारी अनुभवी असल्यामुळे नियमबद्ध व पारदर्शक कारभार होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.


ग्रामस्थांच्या अपेक्षा

प्रशासक राजवटीदरम्यान पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, लाईट बिल, रोजगार हमी योजना यासारखी मूलभूत कामे नियमित सुरू राहावीत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. तसेच नवीन विकास कामांना मंजुरी मिळेल का, निधी वितरण कसे होईल, याकडेही ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

एकूणच १० फेब्रुवारीपासून सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारात मोठा बदल होणार असून प्रशासक राजवटीचा ग्रामीण विकासावर काय परिणाम होतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

0 9 4 8 6 1
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *