धामणगाव बढे, दि. ८ (प्रतिनिधी) :
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेला वाहतूक नियंत्रण कक्ष पूर्ववत सुरू करण्यात यावा, असे निर्देश आमदार संजय गायकवाड यांनी विभाग नियंत्रक, रा.प.भ. बुलढाणा यांना दिले आहेत.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, धामणगाव बढे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून परिसरातील सुमारे २८ लहान खेडी या गावाशी जोडलेली आहेत. या भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी बसने ये-जा करतात, मात्र नियंत्रण कक्ष बंद असल्याने विद्यार्थ्यांना बस पासेस काढण्यासाठी तसेच इतर कामांसाठी मोताळा किंवा बुलढाणा येथे लांबचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.
धामणगाव बढे येथे पूर्वी वाहतूक नियंत्रण कक्ष कार्यान्वित होता. मात्र गेल्या पाच वर्षांपासून तो अज्ञात कारणांमुळे बंद आहे. परिणामी परिसरातील वाहतुकीचे नियोजन विस्कळीत झाले असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा वाहतूक नियंत्रण कक्ष तातडीने सुरू करण्यात यावा, तसेच याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी, असे निर्देश आमदार संजय गायकवाड यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
Users Today : 28