मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :
रेल्वे दक्का परिसरात गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ट्रक भाडेवाढीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. ट्रक युनियनकडून भाडेवाढीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर नगरसेवक प्रसाद जाधव यांच्या पुढाकाराने व प्रभावी मध्यस्थीने सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक प्रसाद जाधव यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ट्रक युनियनचे चालक-मालक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच संबंधित घटकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
विश्राम भवन येथे झालेल्या या बैठकीत सविस्तर, संयमित आणि सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती सर्व पक्षांच्या परस्पर सहमतीने पाच वर्षांपासून रखडलेला भाडेवाढीचा प्रश्न यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आला.
या निर्णयामुळे रेल्वे दक्का परिसरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार असून व्यापारी व्यवहारांनाही गती मिळणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न शांततेत मार्गी लागल्याने व्यापारी, ट्रक चालक-मालक तसेच प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी नगरसेवक प्रसाद जाधव यांनी सांगितले की, “वाहतूकदार व व्यापारी हे एकमेकांवर अवलंबून आहेत. संवाद व समन्वयातूनच प्रश्न सुटू शकतात. सर्व घटकांनी संयम दाखवून सहकार्य केल्यामुळे हा प्रश्न निकाली निघू शकला.”
या बैठकीस नगरसेवक अरुण अग्रवाल, राजू डोफे, अजय सावळे, बनू पैलवान, लखन मेंबर, आर. आर. चव्हाण, संदीप जाधव, विनायक यांच्यासह ट्रक युनियनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 28