मासरुळ, दि. ८ (प्रतिनिधी) :
येथील संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगटदिनानिमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात पार पडला. यामध्ये गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले. तसेच ६ फेब्रुवारी रोजी हभप अजबराव महाराज मिरगे, ७ फेब्रुवारी रोजी हभप संतोष महाराज आढावणे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर सांप्रदायिक भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
प्रगटदिनाच्या दिवशी सकाळी सात वाजता आरती करून गावातून पालखी सोहळा काढण्यात आला. दिंडीमध्ये बालगोपाल वारकरी पोशाखात सहभागी झाले होते. महिला भजनी मंडळ, शिव भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थांनी भारूड, भजन व फुगडीचा मनमुराद आनंद घेत उत्सव साजरा केला.
शेगावचे संत गजानन महाराज हे दत्तसंप्रदायातील महान योगी संत असून त्यांनी लोकांना सेवाभाव व भक्तिमार्गाचे महत्त्व शिकवले. “गण गण गणात बोते” हा मंत्र जगाला देणाऱ्या या अवलिया संतांचा प्रगटदिन मासरुळ येथेही मोठ्या थाटात पार पडला. उत्सव यशस्वी करण्यासाठी गजानन महाराज सेवा समिती व समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.
स्काऊट-गाईड मेळाव्यात चांडक विद्यालयाचा गौरव
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राष्ट्रीय सैनिक स्कूल (कोलवड) येथे स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ली. भो. चांडक विद्यालयाचे स्काऊट व गाईड पथक सहभागी झाले होते.
या पथकाचे नियोजन स्काऊटर मंगलसिंग सोळंके, राजू पाटील व गाईडर फुलपगारे यांनी केले. या पथकाने जिल्ह्यातील शहरी विभागातून प्रोत्साहनपर बक्षीस मिळवून ट्रॉफी व प्रमाणपत्र प्राप्त केले.
या मेळाव्यात सुमारे १२५० स्काऊट-गाईड सहभागी झाले होते. मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिस्त, निवासी तंबू जीवन, स्वयंपाक, दैनंदिन गरजा पूर्ण करणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शेकोटी कार्यक्रम, लोकनृत्य, पथसंचलन, शोभायात्रा, तंबू सजावट, बांबू साहित्य, देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक सादरीकरण असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
या यशाबद्दल विद्यालयातही ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या यशासाठी शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापिका काळबांडे, उपमुख्याध्यापक निंबोळे, पर्यवेक्षक तोमर तसेच सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद यांनी मार्गदर्शन केले.
Users Today : 28