चिखली, दि. ८ (प्रतिनिधी) :
विधानसभा मतदारसंघातील केळवद येथे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडले. या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विद्याधर महाले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून आधुनिक भारताच्या सामाजिक व वैचारिक क्रांतीचे महानायक आहेत. त्यांच्या विचारांमुळे देशाला समानता, न्याय आणि बंधुता यांची भक्कम पायाभरणी मिळाली.
ते पुढे म्हणाले की, बाबासाहेबांमुळेच भारत एकसंघ राहिला असून देशावर त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या महान कार्यामुळेच भारत आज अखंड व सार्वभौम राष्ट्र म्हणून जगासमोर ठामपणे उभा आहे.
तसेच, माता रमाई यांच्या अथक त्यागाशिवाय भीमरावांचे ‘बाबासाहेब’ होणे शक्य झाले नसते, असेही त्यांनी नमूद केले. रमाईंच्या संघर्षमय जीवनामुळे बाबासाहेबांना शिक्षण व सामाजिक कार्यासाठी आवश्यक आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 28